अनंत पावविलीं उद्धार । नव...

 

अनंत पावविलीं उद्धार । नव्हेचि थार मज शेवटीं ॥१॥

पाप बळिवंत गाढें । तुज हें राहों सकतें पुढें ।

मागील कांहीं राहिलें वोढें । नवल केवढें देखियेलें ॥२॥

काय मानिती संतजन । तुमचें हीनत्व वचन।

कीं वृद्ध झाला नारायण । नचले पण आधील तो ॥३॥

आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी ।

पडदा काय घरींच्या घरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥४॥

नको चाळवूं अनंता । कासया होतोसी नेणता ।

काय तूं नाहीं धरिता सत्ता । तुका म्हणे आतां होईं प्रगट ॥५॥

comments powered by Disqus