नामाचिया बळें कैवल्यसाधन ...

 

नामाचिया बळें कैवल्यसाधन । उगेंचि निधान हाता चढे ॥१॥

जाणोनि हें वर्म भक्त भागवत । राहिलों निवांत प्रेमबोधें ॥२॥

कोण जपतप वाहे हें काबाड । म्हणती अवघड या रे नाचों ॥३॥

उघड समाधि हरिकथा सोहळा । नरनारी बाळां लहानथोरां ॥४॥

छंदें वाहती टाळी गाती नामावळी । जयजयकारें होळी दहनदोष ॥५॥

येणें ब्रम्हानंदें दुमदुमिलें जग । सुलभ हा मार्ग सांपडला ॥६॥

तुका म्हणे हरिभक्तीचा उल्हास । आणिलासे त्रास यमदूतां ॥७॥

comments powered by Disqus