अवतार सूर्यवंशीं दिव्य घे...

 

अवतार सूर्यवंशीं दिव्य घेतला स्वामी । एकपत्‍नी व्रत करुनि राहिला नेमी ।

मर्दिलें ताटिकेसी सुख वाटलें भूमी । रक्षोनी यज्ञ केला कीर्ति प्रख्यात नामीं ॥१॥

जयदेवा रघुनाथा जय जानकीकांता । आरती ओंवाळीन तुजलागीं समर्था ॥२॥

विदेही राजयानें पण केलासे भारी । तें शिवचाप मोठें मोडुनियां सत्वरीं ।

वरिलें जानकीसी आदिशक्ति सुंदरी । जिंकुनी भार्गवाला बहु दाविली परी ॥३॥

पाळोनी पितृवाक्य मग सेविलें वन । हिंडतां पादचारी मुक्त तृण पाषाण ।

मर्दिले दुष्ट भारी दैत्य खरदूषण । तोषले सर्व ऋषि त्यांसि दिलें दर्शन ॥४॥

जानकी लक्ष्मणासहित चालतां त्वरें । भेटली भिल्लटी ती तिचीं उच्छिष्ट बोरें ।

भक्षुनी उद्धरिले कबंधादि अपार । देखिली पंचवटी तेथें केला विहार ॥५॥

पातली शूर्पणखा तिचें छेदिलें नाक । जाउनी रावणासी सांगे सकळ दुःख ।

तेथोनी पातला तो मायामारीच देख । पाहतां जानकीसी तेव्हां वाटलें सुख ॥६॥

तें चर्म आणावया राम धांवतां मागें । रावणें जानकीसी नेलें लंकेसी वेगें ।

मागुता राम येतां सीता न दिसे चांग । तें दुःख ठाकुनियां हृदय झालें भंग ॥७॥

धुंडितां जानकीसी कपि भेटला त्यांसी । सुग्रीव भक्त केला मारुनियां वाळीसी ।

मेळविली कपिसेना शुद्धि मांडिली कैसी । मारुती पाठविला वेगेंकरुनी लंकेसी ॥८॥

मारिला आखया तो जंबुमाळी उत्पात । जाळिली हेमपुरी बहु केला निःपात ।

घेउनी शुद्धि आला बळी थोर हनुमंत । सांगता सुखवार्ता मन निवालें तेथ ॥९॥

तारिले सिंधुपोटीं महापर्वत कोटी। सुवेळा शिखरासी आले राम जगजेठी ।

मांडिलें युद्ध मोठें वधी राक्षस कोटी । रावण कुंभकर्ण क्षणामाजी निवटी ॥१०॥

करुनी चिरंजीव बिभीषण जो भक्त । दिधलें राज्य लंका झाली कीर्ति विख्यात ।

देखोनी जानकीला सुखी झाले रघुनाथ । तेहतीस कोटी देव जयजयकारें गर्जत ॥११॥

पुष्पकारुढ झाले अंकीं जानकी भाजा । येतांचि भेटला भरत बंधु वोजा ।

वाजती घोष नाना गुढया उभविल्या ध्वजा । अयोध्येलागीं आला राम त्रैलोक्यराजा ॥१२॥

पट्टाभिषेक केला देव सेविती पाय । चिंतितां नाम ज्याचें दूर होती अपाय ।

उत्सव थोर झाला वाचे वर्णितां नये । तन्मय दास तुका उभा कीर्तनीं राहे ॥१३॥

comments powered by Disqus