मन करा रे प्रसन्‍न

 

मन करा रे प्रसन्‍न ।
सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन ।
सुख समाधान इच्छा ते ॥१॥

मनें प्रतिमा स्थापिली ।
मनें मना पूजा केली ।
मनें इच्छा पुरविली ।
मन माउली सकळांची ॥२॥

मन गुरू आणि शिष्य ।
करी आपुलें चि दास्य ।
प्रसन्‍न आपआपणांस ।
गति अथवा अधोगति ॥३॥

साधक वाचक पंडित ।
श्रोते वक्तें ऐका मात ।
नाहीं नाहीं आनुदैवत ।
तुका ह्मणे दुसरें ॥४॥

comments powered by Disqus