विष्णुमय जग वैष्णवांचा
( सांवळें सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयीं माझे ।
आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड
तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ )
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुह्मी भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥२॥
कोणाही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥३॥
तुका ह्मणे एका देहाचे अवयव ।
सुखदुःख जीव भोग पावे ॥४॥