काय तुझे उपकार

 

काय तुझे उपकार पांडुरंगा ।
सांगो मी या जगामाजी आतां ॥१॥

जतन हें माझें करोनि संचित ।
दिलें अवचित आणूनियां ॥२॥

घडलिया दोषांचे न घाली भरी ।
आली यास थोरी कृपा देवा ॥३॥

नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं ।
न मागतां पाहीं दान दिलें ॥४॥

तुका ह्मणे याच्या उपकारासाटीं ।
नाहीं माझें गाठीं कांहीं एंक ॥५॥

comments powered by Disqus